JODICHA MAMLA entertainment Marathi theater

नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’

नव्या दमाच्या कलाकारांसह रंगणार ‘जोडीचा मामला’

Mumbai: आजची मराठी रंगभूमी नव्या विचारांनी, तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक चौकटींपलीकडे जात तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर आधारित नवे प्रयोग रंगभूमीवर साकारत आहेत. जुन्या-जाणत्या कलाकारांच्या बरोबरीने ताज्या दमाच्या कलाकारांना संधी द्यावी, असा विचार निर्माते-दिग्दर्शकही करू लागलेत. व्यावसायिक नाटकांमधून हे नवं टॅलेंट पाहायला मिळतंय. ‘जोडीचा मामला’ हे असंच एक नवंकोरं नाटक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर एकत्र आले आहेत.
या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली या नव्या नाटकाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध निर्माता – दिग्दर्शक अभिनेते सचिन पिळगांवकर उपस्थित होते. नवे कलाकार रंगभूमीवर येण्याने नाटकांमधून नवी ऊर्जा पाहायला मिळेल, त्यामुळे नव्यांचं येणं मराठी नाटक व्यवसायासाठी चांगलंच आहे, असं मत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.
‘दृष्टी’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ निर्मित ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाले आहे. ‘Black & White कुटुंबाची सप्तरंगी गोष्ट!’ अशी भन्नाट टॅगलाईन असलेल्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार १५ मे दुपारी ४.३० वा.गडकरी रंगायतन ठाणे, येथे रंगणार आहे. सध्याच्या तरुणाईचा आत्मकेंद्रित विचार, बदलती सामाजिक मानसिकता आणि त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम यावर उपरोधिक पण तितकंच भावनिक भाष्य करणारा हा रंगमंचीय प्रयोग प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. ‘जोडीचा मामला’ हे दोन अंकी विनोदी नाटक म्हणजे नातेसंबंध, प्रतिष्ठा आणि वास्तव यांची भन्नाट विनोदी कसरत आहे.
‘आजच्या तरुण पिढीचे विचार, त्यांच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कुटुंबातील बदलती समीकरणं यावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करणारे नाटक प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या कलाकारांना व्यासपीठ देत दर्जेदार मनोरंजन सादर करण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल’, असा विश्वास निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केला.
दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर म्हणाले ‘जोडीचा मामला’ हे नाटक करताना आम्ही विनोदाच्या माध्यमातून आजच्या समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना कुठे ना कुठे स्वतःशी जोडून घेईल. मनोरंजनासोबत विचार करायला भाग पाडणारं हे नाटक प्रत्येक वयोगटाला भावेल’.
‘जोडीचा मामला’ नाटकात योगेश कदम, प्राची कात्रे, पायल साळुंके, वैभव महाले, विशाल दुराफे, अश्विनी माळी, विनायक जाधव, प्रदीप कसबे, श्वेता काजळे, अभिजीत पाटसकर, आकाश राठोड, दुर्गेश लांडगे आणि श्रेयस इंदापूरकर हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. नाटकाचे लेखक आणि संगीतकार चैतन्य कुलकर्णी असून दिग्दर्शनाची धुरा श्रेयस इंदापूरकर यांनी सांभाळली आहे. नाटकाची निर्मिती श्रेयस इंदापूरकर आणि राहुल भंडारे यांनी केली आहे.नेपथ्य संदेश बेद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नृत्य दिग्दर्शन ऋषीकेश देसाई यांनी केले आहे. तसेच अवधूत गुप्ते, श्रद्धा आपटे-केळकर आणि युगंधर देशमुख यांच्या आवाजाने नाटकातील गाण्यांना विशेष रंग चढला आहे. रंगभूषा उलेश कंधारे तर वेशभूषा प्राची कात्रे आणि श्रद्धा हांडे यांनी केली आहे.
शुभारंभाच्या प्रयोगा नंतरचे पुढील प्रयोग शनिवार १६ मे रात्री८.३० वा.आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण, रविवार १७ मे दुपारी १२.०० वा.विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी, मंगळवार १९ मे दुपारी ४.०० वा.शिवाजी मंदिर दादर, रविवार ३१ मे दुपारी ४.०० वा.यशवंत नाट्यगृह माटुंगा येथे होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

Karan Kundrra & Tejasswi Prakash Enter Dubai’s Most Exclusive Desi Circle- But Can They Keep Up? Netflix’s Desi Bling Premieres May 20, Trailer Out Now

Print 🖨 PDF 📄 eBook 📱Karan Kundrra & Tejasswi Prakash Enter Dubai’s Most Exclusive Desi Circle- But Can They Keep Up? Netflix’s Desi Bling Premieres May 20, Trailer Out Now Mumbai : New city. New circle. Whole new game. Netflix today unveiled the trailer and premiere date for Desi Bling, the upcoming reality spectacle premiering […]

घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री!

Print 🖨 PDF 📄 eBook 📱घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री! Mumbai: अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट तसेच ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. निर्माते रसिक […]