Saikal se Narmada Parikrama : सायकलवरून नर्मदा परिक्रमा : एका स्त्रीच्या आत्मशोधाचा प्रवास
Saikal se Narmada Parikrama : सायकलवरून नर्मदा परिक्रमा : एका स्त्रीच्या आत्मशोधाचा प्रवास
UNN: पुण्यात राहणारी ज्योती भक्त, तुमच्या-आमच्यासारखी एका चौकटीतली ! नोकरी करत घरही उत्तमरितीने सांभाळणारी ! काळ त्याच्या गतीने पुढे जाताना नेहेमीच्या आयुष्यातले कर्तव्यपूर्तीचे आणि वयाचेही टप्पे गाठले जात होते. पन्नाशीच्या सुमारास जेव्हा मुलाचं मास्टर्सचं शिक्षण पूर्ण झालं, त्या टप्प्यावर ज्योतीला केवळ संसार एके संसार आणि नोकरी दुणे नोकरी या चक्रातून बाहेर पडून स्वतःला आयुष्यात काय करावसं वाटतं याचा शोध घेण्याची निकड भासायला लागली. दिवसेंदिवस ही स्वशोधाची उर्मी प्रबळ होत गेली आणि ज्योतीने ब-याच विचाराअंती २०१७ मध्ये आपली महिन्याची एक तारीख सुफलित करणारी कॉर्पोरेट क्षेत्रानली नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
खरंतर तेव्हा या स्वशोधाच्या प्रवासाची सुरुवात क
शी करावी हे उमगत नव्हतं. कारण पंचवीस- एक वर्षांच्या संसार चक्रात फिरताना स्वतःचा विचार करायला वेळ होत नाही आणि केलाच तरी बऱ्याचदा घरच्यांवर अन्याय होतोय का आपल्यामुळे याची उगाच एक टोचणी लागते. त्यामुळे ‘मला काय करायला आवडेल ? कोणती वाट मी निवडू ?’ असा विचार करायला देखील प्रयत्नपूर्वक शिकायला लागतं. स्वेच्छानिवृत्तीनंतर ज्योतीने या प्रश्नांच्या शोधात विविध गोष्टी केल्या. देश – विदेशात भरपूर भटकंती केली. तरीही मनाजोगं फार काही सापडत नव्हतं. तेव्हढ्यात जग कोव्हिङच्या संकटात सापडलं आणि चक्र जागीच थांबलं. पण याचकाळात ज्योतीला आपली सच्ची साथीदार गवसली – सायकल !
कोव्हिडकाळात घरी strength training चे व्यायाम सुरू केले. बंधनं थोडी शिथिल झाल्यावर मैत्रीणीबरोबर १६ किलोमीटरची सायकल राईड तिने केली. पहिल्या राईडने ज्योतीला शरीराने थकवून टाकलं; पण मनात मात्र ‘उदया परत एकदा सायकल राईड करायलाच पाहिजे’ ही इच्छा जागी झाली. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी पेक्षा १० किलोमीटर्स अधिक असं करत करत ज्योती सायकल राईडचा आनंद घेऊ लागली. व्यायाम गांभीर्याने होऊ लागला. सिंहगड किल्ला नियमाने चढ – उतर करताना बळ वाढत होतं. आणि २०२१ मध्ये वाढदिवसाला, पुणे ते पनवेल या यशस्वी सायकल राइड ने मस्त साजरा झाला. सायकल हा हळूहळू आयुष्याचा अविभाज्या भाग झाली. समान विचारसरणीचा ग्रुप मिळाला आणि ज्योतीची सायकल सुसाट सुटली. सायकल हे आपलं श्रेयस आणि प्रेयस आहे याची ज्योतीला जाणीव झाली. आता पुणे ते सुंदरबन (२१०० किलोमीटर्स) अशा लांब अंतराच्या सायकल सफारी सुरू झाल्या. त्यानंतर मग हिमालयातल्या अतिउंचावरची श्रीनगर- लेह – खारदुंगला ही कसोटी पाहणारी सायकल वारीही झाली. मेळघाट ,तामिळनाडू अशा सायकल सफारी , एव्हरेस्ट बेस कॅम्प सारखे ट्रेक अशा मोहीमा सुरू झाल्या.

आपण इतकं सायकलिंग करतो तर मग अतिशय पवित्र अशी ‘नर्मदा परिक्रमा’ आपण सायकलवर केली पाहिजे असा विचार ज्योतीच्या मनात आला. २०२४ मधला तो नोव्हेंबर महिना होता. जानेवारी २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात ३००० किलोमीटर्सची परिक्रमा सुरू करायची आणि ती साधारण चाळीस दिवसात पूर्ण करायची. म्हणजेच रोज जवळ जवळ ९० ते १०० किलोमीटर्सचं सायकलिंग करायची असे ठरले. सायकलिंगची सराव तर होताच पण परिक्रमेसाठी मनाची तयारीही पाहिजे होती. कारण इतका वेळ देऊन परिक्रमा करायला सोबत यायला कुणी नव्हतं, एकटीनेच प्रवास करायचा होता. पण जायचा निर्धार तर केला होता.
परिक्रमेत स्वतःचे सामान सायकलवर लादून जायचे होते त्यामुळे वजन मोजून-मापून सामान कसं घ्यावं, या जोडीला रस्त्यात सायकल बिघडल्यास पंक्चर काढणं , सायकलची बेसिक दुरुस्ती हे शिकणं सुरू होते. त्याशिवाय youtube video पाहून, अनुभवी लोकांशी भेटून-बोलून स्वतःचा route map बनवणं हेही करायचं होते. Hiighway नाही तर गावागावांतला रस्ता निवडायचा होता कारण नर्मदा मैय्याचं सान्निध्य पाहिजे होतं. पुण्यहून २२ जानेवारीला ज्योती इंदूरला जायला निघणार होती. मनावर एकटीने जाण्याचं दडपण होतंच पण नर्मदा माईचं प्रेम-आकर्षण आणि सायकलची साथ दडपण कमी करत होते. निघायच्या अगदी दोन-तीन दिवस आधी सायकलिंग ग्रुप मधले शिरीष लोणकर ज्योतीबरोबर परिक्रमेसाठी सज्ज झाले.
२३ जानेवारीला नर्मदेच्या दक्षिण तटावरील ममलेश्वरला परिक्रमेचा संकल्प उचलून सायकलला पेडल मारलं आणि सुरू झाला एक अनोखा प्रवास. हा प्रवास फक्त रस्त्यावरच्या अंतराचा नव्हता तर एक नदी, तिच्या दीर्घ तीरांवर नांदणारी संस्कृती-परंपरा जाणून घेण्याचा होता आणि अंतर्यामीच्या शोधाचा – बदलाचाही होता. ज्योती आणि शिरीष ह्यांना वाटेत अजून तीन सायकलस्वार येऊन मिळाले – गजेंद्र मंडलोई, संदीप बिर्ला आणि संदीप इर्ला.
पुढच्या सर्व प्रवासात मग हे पंचक एकत्र राहिलं. प्रवासाला सुरुवात करायच्या दोन दिवस आधीपर्यन्त ज्योती एकटीच या यात्रेला निघाली होती. पण तिचा निश्चय पक्का होता. तिच्या सकारात्मकतेमुळे कदाचित शिरीष आणि हे त्रिकुट ज्यांना ज्योती प्रेमाने मैय्याने पाठवलेले ब्रह्मा-विष्णु-महेश म्हणते , ते जोडले गेले असावेत. काँरवा बनता गया !

शेता – बांधावरून, खडबडीत रस्त्यांवरून, लहानमोठ्या गावांमधून मार्गक्रमण सुरु होते. रावेरखेडी येथील थोरल्या बाजीरावांची समाधी- सारखी ऐतिहासीक स्थळे इतिहासाचा समृद्ध वारसा आणि अभिमान जागवत होती. तर सुश्री भारती ठाकूर यांचं ‘नर्मदालय’ सारखे मानवतेचे महामंदिर पाहून संतभेटीची प्रचिती येत होती. स्वतःमधल्या बदलाची- परिवर्तनाची सुरुवात अशा गोष्टी पाहून–अनुभवून होत होती. नर्मदा मैय्याची ही परिक्रमा म्हणजे केवळ अनुभव नव्हे तर वैयक्तिक अनुभूती असते. एका लहानशा गावातलं लहानसं घर ; तिथली मैय्या अंगणात झाडझूड करत होती. परिक्रमावासी दिसल्यावर तिने साहजिकच त्यांना चहाचं आमंत्रण दिलं. “काली चाय चलेगी ?’ या प्रश्नावर अर्थातच सगळे ‘हो’ म्हणाले. परिक्रमेचं व्रत घेतलेल्यांनी ‘मला हे हवं नी ते हवं’ असं करायचं नसतचं! चहाबरोबर एक-दोन मुठी चिवडाही त्या मैय्याने दिला. नंतर तिच्याशी बोलताना समजलं की तो चिवडा म्हणजे घरातलं शेवट्चं अन्न होतं. आता सगळे डबे रिकामे पण परिक्रमावासींची सेवा केल्याचा आनंद त्या मैय्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. दानत कशी असावी याचा वस्तूपाठ जणू मिळाला. परिक्रमावासींची सेवा म्हणजे आपल्याला सांभाळणाच्या नर्मदामातेची सेवा ! या भावनेतून जागजागी अशी सेवा करणारी विलक्षण माणसं प्रवासात भेटत गेली. हजारो वर्षांची नर्मदा परिक्रमा सुरु राहिली पाहिजे का भावनेतून कोणताही भेद-भाव न करता परिक्रमावासींची सेवा केली जाते, अगदी निरपेक्षपणे !
प्रवासी जाये जा-ये करत असतात पण गावागावातले हे सेवेकरी मनोभावे पिढ्यानपिढ्या हे सेवाव्रत करतात , अचलपणे – अढळपणे. शंका न घेता , अपेक्षा न बाळगता अशी सेवा गरीब-श्रीमंत सर्वच करताना दिसतात. गरीबी विचारांची आणि मनाची असू शकते ही जाणीव इथे वारंवार होते. मी निरपेक्षपणे केवळ सेवा म्हणून काही करते का ? माझ्या घासातला घास काढून कुणाला देते का ? एखाद्या नदीच्या मातृत्त्वशक्ती वर तिथल्या प्रजेसारखा विश्वास ठेवू शकते का? माझं – माझ्यापुरतं – याला ओलांडणारा आत्मशोध या परिक्रमेच्या निमित्ताने घेता येतो तो कदाचित हाच असावा असं ज्योती गहिवरून सांगते स्त्री परिक्रमावासीला “मैय्या” तर पुरुषाला ‘महाराज’ म्हणतात. महीनाभर सतत “मैय्या” अशी गोड हाक आजही ज्योतीच्या हृदयान भरून आहे आणि सायकलवाली परिक्रमावासी मैय्या म्हणून होणारं कौतुकही !
शेत- झाडीतल्या रस्त्यांवरून जाताना कसरत व्हायची. चिखलाने सायकल घसरायची, घाट चढ-उतार करताना तर प्रचंड दमछाक व्हायची. पण ‘नर्मदे हर’ चा जप करत असताना ती घेत असलेली काळजी जाणवायची. दिवस सरताना आलेला थकवा, रात्रीच्या विश्रांतीनंतर निघून जायचा आणि सकाळी परत उत्साहाने सायकलवर स्वार ! प्रवास सुरू करताना जी ऊर्जा होती , उत्साह होता तोच मैय्याच्या कृपेने शेवटपर्यन्त राहीला. ज्योतीचा पाय वाटेत एका ठिकाणी प्रचंड दुखावला. पण आपला संकल्प पूर्ण झाला पाहिजे या ओढीने ते दुखणंही तिने सहन केलं.
विमलेश्वराला तटपरिवर्तन करून उत्तरतटावर हे सायकलवीर आले. मजल-दरमजल करीत जात असताना नदीचा उगम जवळ येऊ लागला. ॐकारेश्वर अवघ्या काही किलोमीटर्सवर आलं. त्या दयाळू नर्मदा मातेने लेकरांकडून परिक्रमेचा संकल्प पूर्ण करून घेतला याची जाणीव थरारून टाकणारी होती. ३००० किलोमीटर्स चा प्रवास ३४ दिवसात करत २५ फेब्रुवारीला ही परिक्रमा संपूर्ण झाली. वैयक्तिक गरजा कमीत कमी ठेवून आनंदात कसं जगावं , निरपेक्ष भावनेने सेवा कशी करावी याबरोबरच स्वतःच्या उद्दिष्टावर ठेवलेला विश्वास किती महत्वाचा असतो, हे अनमोल संचित ज्योतीला या परिक्रमेतून मिळालं. परिक्रमाकरून पुण्याला परतल्यावरही ती नर्मदा आपल्या अंत:करणात झुळझुळते आहे, नवी उमेद जगण्याची नवी दृष्टी देते आहे याची सतत जाणीव ज्योतीला आहे. नद्या जपण्याची, त्यांच्याकाठच्या समृद्ध संस्कृती – परंपरा अनुभवण्याची शक्य तशी संधी सर्वांनी घ्यावी असं ज्योती भावनिक होऊन म्हणते आणि कदाचिन मनात पुन्हा पुढच्या अशाच एका अनुभवाच्या प्रवासाचा बेत करते. ज्योतीच्या नर्मदा परिक्रमेची यात्रा ही केवळ एका स्त्रीच्या सायकलवर केलेल्या प्रवासाची गोष्ट नाही; ती एक स्वतःचा शोध घेण्याची, आतल्या आवाजाला प्रतिसाद देण्याची आणि जीवनाच्या एका नव्या अध्यायात प्रवेश करण्याची कथा आहे.
नर्मदे हर – प्राची जोशी हर्षे ( पुणे )
