the film palkhi based unwavering faith devotion sai babas palanquin

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , ‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , ‘पालखी’ चित्रपटाचा मुहूर्त

Mumbai: श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ विश्वासावर आधारित पालखी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पालखी’ हा चित्रपट म्हणजे साईबाबांवरील अढळ श्रद्धा, पालखीची सेवा आणि भक्तांच्या निस्वार्थ भावनेची कलाकृती ठरणार आहे. केएसआर फिल्म्स निर्मित पालखी चित्रपटाचा मुहूर्त आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते असंख्य साई भक्तांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. निखिल चंद्रकांत पाटील लिखित पालखी चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयश राज आंगणे करीत आहेत. प्रभू कापसे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
सिद्धार्थ बोडके, यतिन कार्येकर, प्रवीण तरडे, सुबोध भावे, किशोर कदम, गौरी नलावडे, वीणा जामकर, संदीप गायकवाड, शंतनू रांगणेकर, ओंकार कदम, अथर्व रुके असे मराठीतील अनेक नामवंत कलाकार पालखी या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. ‘साईबाबांची लीला अगाध आहे. मी स्वतः साईभक्त आहे. साईबाबांच्या पालखीवरील हा चित्रपट लाखो साईभक्तांना प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त करीत आमदार रवींद्र चव्हाण यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
पालखी म्हणजे श्रद्धेची चालती-बोलती अनुभूती. पालखीसोबत चालताना मन निर्मळ होते,अहंकार गळून पडतो आणि भक्तीची अपार ऊर्जा अनुभवायला मिळते. हीच ऊर्जा आमच्या या चित्रपटातून मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक श्रेयश राज आंगणे यांनी व्यक्त केला.
पालखी हा चित्रपट एका सामान्य युवकाच्या जीवनातील संघर्ष, प्रश्न आणि वेदनांच्या काळोखातून आशेच्या प्रकाशाकडे नेणारा प्रवास उलगडतो. चित्रपटाची पटकथा आणि संवाद निखिल चंद्रकांत पाटील, श्रेयश राज आंगणे यांची आहे. छायांकन हरेश सावंत तर संकलन प्रशांत खेडेकर यांचे आहे. कलादिग्दर्शक नितेश नांदगावकर आहेत. संगीत श्रेयश राज आंगणे याचे आहे. रंगभूषा राजेश वाळवे तर वेशभूषा सिद्धी योगेश गोहिल यांची आहे. साहसदृश्ये जबाबदारी रवी दिवाण यांनी सांभाळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated